बेळगाव : कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा येथील प्राध्यापिका वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी “कर्नाटकातील निवडक रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदलांचे परिणाम” या विषयावर सखोल संशोधन करून डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळविली आहे. त्यांनी ही पदवी मध्य प्रदेशातील मालवांचल विद्यापीठ, इंदोर येथून संपादित केली असून हे विद्यापीठ भारतीय परिचारिका परिषद (Indian Nursing Council) मान्यताप्राप्त आहे.
यापूर्वी प्रा. सई पाटील यांनी कर्नाटकातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातून एम.एस्सी. नर्सिंग ही पदवी घेतली होती. त्यानंतर बेळगाव शहरातील विविध रुग्णालयांमध्ये वरिष्ठ परिचारिका म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या व्यावसायिक अनुभवाच्या आधारे त्यांनी वरील विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनाची दखल घेत विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
प्रा. सई पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांमध्ये दीर्घकाळ कार्य करत शिक्षण, सेवा आणि संशोधन यांचा समतोल साधला आहे. त्या स्वर्गीय प्रा. सी. व्ही. पाटील यांच्या स्नुषा होत. या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








