- १९ ते २१ डिसेंबरला रौप्य महोत्सवी सोहळा
- विदेशी कलाकारांचा सहभाग
नवी दिल्ली : गोव्याच्या काणकोण येथे येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या २५ व्या रौप्य महोत्सवी काणकोण लोकोत्सवाच्या उद्घाटनाचे आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. गोव्याचे क्रीडा, युवा व्यवहार, आदिवासी कल्याण तसेच कला व संस्कृती मंत्री डाॅ. रमेश तवडकर यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निमंत्रण सुपूर्द केले. या भेटीवेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे उपस्थित होते.
सन २००० पासून सतत आयोजित केला जाणारा काणकोण लोकोत्सव आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवलेला उपक्रम बनला आहे. कला, संस्कृती, क्रीडा, लोककला, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि आदिवासी परंपरेचा वारसा यांचा संगम असलेला हा लोकोत्सव गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा उत्सव ठरला आहे.
राष्ट्रपतींसोबत झालेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान डाॅ. तवडकर यांनी गेल्या २४ वर्षांतील लोकोत्सवातील उपक्रम, ‘श्रमधाम’ या सामाजिक योजनेअंतर्गत गरीबांना घरे बांधून देण्याचे कार्य तसेच ‘बलराम शिक्षण संस्था’ मार्फत ग्रामीण भागात उभारलेले शैक्षणिक प्रयोग यांची माहिती सविस्तर दिली.
६४व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त सुरू होणारा यंदाचा लोकोत्सव विशेष ठरणार आहे. देशातील विविध राज्यांतील आदिवासी आणि लोककलाकारांसोबतच आशिया व युरोपमधील सांस्कृतिक कलाकारही यंदा सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या लोकोत्सवाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन डाॅ. तवडकर यांना दिले.