- भाविकांमध्ये संताप
कलबुर्गी / वार्ताहर
कलबुर्गी जिल्ह्याच्या उडचन गावातील हिरेमठात धक्कादायक घटना घडली असून, शांतलिंग स्वामीजींनी मठाच्या आवारात हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतलिंग स्वामीजी काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत मठात आले होते. त्यावेळी त्यांनी मठात गोंधळ घातल्यामुळे संतप्त भाविकांनी त्यांना मठाबाहेर काढले होते. या घटनेनंतर नवीन मठाधीश नियुक्त करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
मात्र, सुमारे आठवडाभरापूर्वी शांतलिंग स्वामीजी पुन्हा मठात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मठाच्या परिसरात उभे राहून हवेत गोळीबार केला. हा प्रकार विरोधकांना धमकी देण्यासाठीच केल्याचा आरोप केला जात असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये भीती व संताप निर्माण झाला आहे.







