पुणे : गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची एक ठळक ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले. गायक, संगीतकार, वादक, गीतकार तसेच तांत्रिक क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करून इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात शास्त्रीय अजित कडकडे संगीत आणि भजनासाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बासरीवादनातील उत्कृष्टतेसाठी अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर तांत्रिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला. ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला, तर अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून गौरविण्यात आले. विशेष कामगिरीची दखल घेत आकाश देशमुख (टेंभुर्णी) यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर परदेशात मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या व्ही. रमेश (सौदी अरब) यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.








