कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून पन्हाळा परिसरात मुसळधार पाऊस झाला. चैत्र यात्रेदरम्यान जोतिबा डोंगरावर उपस्थित असलेले भाविकही या पावसात भिजले.
दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसादरम्यान जोतिबा डोंगरावर वीज कोसळण्याची घटना घडली. दक्षिण दरवाजाजवळील एका झाडावर वीज पडली असता, त्याच्या जवळ उभ्या असलेल्या पाच जणांना किरकोळ दुखापत झाली.
घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या ठिकाणापासून सुमारे सात ते आठ फूट अंतरावर वीज कोसळल्याचे सांगितले जात आहे. विद्युत चुंबकीय परिणामामुळे त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळाली आहे.








