- तीस हून अधिक जखमी
बैलहोंगल / वार्ताहर
म्हैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शेतकरी परिषदेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन ३० हून अधिक शेतकरी जखमी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जालिकोप्प गावाजवळ घडली.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनातील शेतकऱ्यांना गंभीर दुखापती झाल्या. त्यापैकी ९ हून अधिक जणांच्या हाताला, पायाला व पाठीला गंभीर इजा झाली आहे. अपघातग्रस्त सर्व शेतकरी बैलहोंगल तालुक्यातील गरजुरा गावातील रहिवासी असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व मदतकार्य केले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर जखमींवर बैलहोंगल सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिषदेला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या प्रकरणी बैलहोंगल पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अतिवेग किंवा चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.









