- २ – १ ने मालिका खिशात ; यशस्वीचा ‘विराट’ धमाका
विशाखापट्टणम : कर्णधार के. एल. राहुलच्या मार्गदर्शनाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची निर्णायक एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकत शानदार कामगिरीची नोंद केली. तिसऱ्या सामन्यात भारताने आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवत मालिकाही आपल्या नावावर केली.
- रोहित – यशस्वी यांची पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी :
२७१ धावांचे लक्ष्य गाठताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी जबरदस्त सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी करून रोहितने ७५ धावांची आक्रमक खेळी खेळत संघाची भक्कम पायाभरणी केली. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि जैस्वालसोबत विजय सफर सुरू ठेवली. यादरम्यान यशस्वी जैस्वालने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असलेला विराट कोहली देखील तुफान फॉर्ममध्ये होता. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावल्यानंतर या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.
- दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात :
प्रारंभी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने रयान रिकेल्टनला शून्यावर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. मात्र त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वाची भागीदारी करत आफ्रिकेला सामन्यात परत आणले. पण रवींद्र जडेजाने बावुमाला ४८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी धारदार मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना क्रीजवर टिकण्याची संधीच दिली नाही. अखेर ४७ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संपूर्ण संघ २७० धावांवर गडगडला. त्यामुळे निर्णायक वनडे सामन्यात भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य ठेवले.
- कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने केली द. आफ्रिकेची कोंडी :
प्रोटियाजविरुद्ध भारतीय गोलंदाजी कमालीची प्रभावी ठरली. अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वपूर्ण बळी घेतला, जो त्याचा या सामन्यातील एकमेव विकेट ठरला. तर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेत आफ्रिकेची कोंडी केली. याशिवाय रवींद्र जडेजाच्या खात्यातही १ विकेट जमा झाला.








