- हार्दिकचा निर्णायक झंझावात
कटक : भारताने पहिल्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल १०१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी बजावली. कटकमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १७५ धावा केल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ७४ धावांवर गारद झाला.
- दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात :
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. १७५ धावांच्या उद्दिष्ठाचा पाठलाग करताना पावरप्लेअखेर आफ्रिकेने तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतरही आफ्रिकेचे फलंदाज नियमित अंतराने माघारी परतत गेले आणि एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यांच्या खराब फलंदाजीची झलक म्हणजे संपूर्ण संघातून केवळ चारच फलंदाज दहाच्या पुढे जाऊ शकले. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर कर्णधार एडेन मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी १४, तसेच मार्को यान्सेनने १२ धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतली, ही सामन्याची खास बाब ठरली. याचदरम्यान जसप्रीत बुमराहने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला. तो हा पराक्रम करणारा अर्शदीपनंतर भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
- शुभमन गिल – सूर्यकुमार यादव मोठी खेळी साकारण्यात अपयशी :
प्रारंभी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारताची सुरुवात अडखळती झाली. मानेच्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा उपकर्णधार शुभमन गिल (४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१२) यांची निराशाजनक कामगिरी सुरू राहिली. लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर समोरील दिशेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हे दोघेही बाद झाले. अभिषेक शर्मालाही (१२ चेंडूंत १७) छाप पाडता आली नाही. यानंतर अक्षर पटेलला (२१ चेंडूंत २३) पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने आणि तिलक वर्माने (३२ चेंडूंत २६) संयमाने फलंदाजी करताना भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाच षटके खेळून काढताना ३० धावांची भागीदारी रचली. एन्गिडीने तिलकला माघारी धाडल्यानंतर हार्दिक फलंदाजीला आला. त्याने केशव महाराजच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचत आपले मनसुबे स्पष्ट केले. अन्य फलंदाज झगडत असताना हार्दिकने मात्र आक्रमक खेळ करताना भारताच्या डावाला गती दिली. त्याने २८ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा फटकावल्या. त्यामुळे एकवेळ दीडशे धावाही अवघड वाटत असताना भारताला १७५ धावांची मजल मारता आली.









