• आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीची विजयी सुरुवात

दुबई : टीम इंडियाने आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीत विजयी सुरुवात केली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर ४ फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत धमाकेदार विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीन केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केले.

पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. दोघांनी मिळून ९ व्या षटकात भारतीय संघाला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. अभिषेक शर्माने फक्त २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण १० व्या षटकात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. यावेळी अर्धशतकाच्या जवळ असलेला शुभमन गिल ४७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही न उघडता ११ व्या षटकात बाद झाला.

१३ व्या षटकात भारताला तिसरा मोठा धक्का बसला तेव्हा अभिषेक शर्मा ७४ धावा करून बाद झाला. त्याच्या झंझावाती खेळीत ५ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण १७ व्या संजू सॅमसन १३ धावांवर बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. शेवटच्या षटकांमध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने १९ चेंडूत ३० धावा केल्या आणि एक चौकार मारून भारताचा विजय निश्चित केला.

प्रारंभी भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान ही सलामीची जोडी मैदानात उतरली. दोघांनीही सुरुवातीला आक्रमक खेळ दाखवत तुफानी फटकेबाजी सुरू केली. पण हार्दिक पांड्याने फखरला परत पाठवले. तो ९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान आणि सईम अयूब यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला.

मात्र, शिवम दुबेने सईम अयूबला (१७ चेंडूत २१ धावा) बाद करत ही जोडी फोडली. पाकिस्तानचा दुसरा विकेट ९३ धावांवर पडला. त्यानंतर पाकिस्तानला पटकन आणखी दोन धक्के बसले. हुसैन तलत फक्त १० धावांवर कुलदीप यादवच्या फिरकीला बळी पडला.

  • साहिबजादा फरहानचे अर्धशतक :

साहिबजादा फरहानने तुफानी कामगिरी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र शिवम दुबेने पुन्हा भारताला यश मिळवून दिले. कर्णधार सूर्यकुमार यादवने झेल घेत फरहानला माघारी पाठवले. फरहानने ४५ चेंडूत ५८धावा केल्या, त्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर मोहम्मद नवाज १९ चेंडूत १९ धावा करून धावबाद झाला. शेवटी कर्णधार सलमान आगा आणि फहीम अशरफ यांनी केवळ ९ चेंडूत २२ धावांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव १७२ धावांवर नेला.