बेळगाव / प्रतिनिधी
नागेनहट्टी येथे श्री इराण्णा कडाडी यांच्या अनुदानातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे तसेच नव्याने बांधलेल्या ग्रंथालय आणि शाळा इमारतीचे आज सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, “नागेनहट्टीसारख्या छोट्या गावात आता सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, हे आनंददायी आहे. ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गावात उल्लेखनीय विकास घडला आहे. भविष्यात गावासाठी आमच्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे त्यांनी सांगितले.

भाजपा बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, “ इराण्णा कडाडी यांनी ज्या-त्या गावांत व्यायामशाळा, ग्रंथालय, मंदिर, समुदाय भवन, बसस्थानक आदी सुविधा उभारण्यासाठी अनुदान देऊन सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. नागेनहट्टी गावचे सुपुत्र नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत सीसी गटार, नवीन शाळा इमारत, स्मशानभूमीत शेड, आठ रस्त्यांचे बांधकाम, २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा, चार बोअरवेल, नऊ पाण्याच्या टाक्या अशा अनेक विकासकामांद्वारे आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला बुडा माजी अध्यक्ष श्री. संजय बेळगावकर, सोहळ्याचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील, पंकज घाडी, संतोष जैनोजी, मारुती लोकूर, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य तसेच नागेनहट्टी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








