- खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत आवाहन
खानापूर / प्रतिनिधी
१७ जानेवारी हुतात्मा दिन संदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती,बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
सुरुवातीला मधल्या काळात दिवंगत झालेल्या समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजाराम देसाई यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
खानापूर तालुक्यात विभक्तपणे कार्यरत असणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवा समिती समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनीही आजच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली.तसेच सीमालढ्यातील पहिले हुतात्मे कै. नागाप्पा होसुरकर यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत सीमाप्रश्नी विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) बेळगाव जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करा अशी मागणी सीमाभाग युवा समितीच्या वतीने कोल्हापूर मुक्कामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केल्याचे सांगितले.
तर शुभम शेळके यांच्यावर कानडी संघटनाने प्रशासनावर आणलेल्या दबावा संदर्भात बैठकीत चर्चा होऊन शुभम शेळके यांच्या पाठीशी प्रत्येक माणसाने उभे राहावे असे आवाहन करून, युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेला खानापूर तालुका समितीने सहकार्य करून आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन धनंजय पाटील यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील राहूया व मध्यवर्तीला विश्वासात घेऊन एकदा दिल्लीला धडक देऊया असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आवाहन करत प्रामाणिक युवा कार्यकर्त्यांना कानडी प्रशासनाने त्रास देणे कदापि सहन केले जाणार नाही असे सांगितले.
मुरलीधर पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील नेत्यावर टिकेची झोड उडवत एकदा बेळगाव सीमा भाग हवा की नको महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्पष्ट करावे असे ठणकावले.
अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी हुतात्मा दिन सर्वांनी गांभीर्याने पाळून बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केले. पत्रकार दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी शहरांतर्गत निकृष्ट रस्ता काम विरोधात मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी जे उपोषणाचे हत्त्यार उपसले आहे त्याला तालुका समितीच्या वतीने पाठिंब्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मंगळवारी ११ वाजता जांबोटी, बुधवारी ३ वाजता नंदगड तर शुक्रवारी ११ वाजता कणकुंबी येथे हुतात्मा दिनाची जनजागृती होणार असून त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. वसंत नवलकर व इतरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीनंतर खानापूर बाजारात पत्रके वाटून जागृती करण्यात आली. यावेळी प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, डी. एम. भोसले, अरुण देसाई, जे. बी. पाटील, बी. बी. पाटील, नागोजी पावले, रुक्मांना झुंझवाडकर, शशिकांत सडेकर, अनंत पाटील, विठ्ठल गुरव, डी. एम.गुरव, आप्पासाहेब मुतकेकर, नागेश भोसले, सदानंद पाटील, म्हात्रु धबाले व इतर उपस्थित होते.








