- उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाचे समन्स कायम
बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना ‘पोक्सो’ प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेले समन्स उच्च न्यायालयाने कायम ठेवले असून, त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस मार्ग मोकळा झाला आहे.
कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यावर येडियुराप्पा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना समन्स बजावले होते. याच निर्णयाला आव्हान देत येडियुराप्पा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्रहायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली खटला पुढे चालवण्याची परवानगी दिली.
प्रकरणाची पार्श्वभूमी: मार्च २०२४ मध्ये एका १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती की, बेंगळुरूतील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी येडियुराप्पा यांनी मदतीसाठी आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सदाशिवनगर पोलिस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते सीआयडीकडे वर्ग करण्यात आले.
जून २०२४ मध्ये सीआयडीने ७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यात येडियुराप्पा आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर पुरावे नष्ट करणे आणि प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. दरम्यान, पीडित मुलगी आणि तिच्या आईने मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवले होते. दुर्दैवाने, मुलीच्या आईचे २६ मे २०२४ निधन झाले.
या निर्णयानंतर, येडियुराप्पा यांच्यावरील खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








