• आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक
  • २३ लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
  • पोलिसांच्या कारवाईने नागरिकांना दिलासा

बेळगाव / प्रतिनिधी

रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. विद्यानगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या या टोळीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान विद्यानगर परिसरातील अभिषेक सुरेश पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेत २८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे दीड किलो चांदीचे पूजेचे साहित्य असा सुमारे २३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याच काळात सरस्वती संजू बडिगेर यांच्या घरातूनही सुमारे अडीच तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांप्रकरणी हारूगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी टोळीचा माग काढत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे हारूगेरी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.