गोकाक : बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील राजापूर गावात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक संशयातून निर्माण झालेल्या वादाने अखेर एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंजुनाथ सुभाष येने (वय २३, रा. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या गैरसमजातून गावातील एका व्यक्तीने संशयातून मंजुनाथबद्दल मनात तीव्र राग धरल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. याच कारणातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

१९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंजुनाथ विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेला असताना, तेथे दबा धरून बसलेल्या व्यक्तीने अचानक त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले. लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केल्याने मंजुनाथ गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत मंजुनाथच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटप्रभा पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक २८/२०२६ नोंदवण्यात आला. या प्रकरणी बीएनएस २०२३ मधील कलम १०३(१) अंतर्गत तपास सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक एच.डी. मुल्ला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.