गोकाक : गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत चोरीला गेलेले मोबाईल, पंपसेट आणि दागिने पोलिसांनी शोधून काढून मूळ मालकांना परत केले आहेत. हा मुद्देमाल बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्याहस्ते परत करण्यात आला.
एसपी के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, काही लोक अवैध धंद्यांवर पोलिसांनी पायबंद घालल्यामुळे सूडबुद्धीने कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करत आहेत. अशा तक्रारींची सत्यता पडताळल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल.

नागरिकांनी चोरीला गेलेले दागिने किंवा मोबाईल न घाबरता स्थानिक पोलिस ठाण्यात तातडीने फिर्याद द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रायबाग व कागवाड तालुक्यात सुरू असलेल्या मटका व्यवसाय, रेशन तांदळाची तस्करी आणि अवैध दारू विक्रीविषयी माहिती मिळताच कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश एसपींनी दिले आहेत.
गोकाकमध्ये बेकायदेशीर सावकारी (मीटर व्याज) संदर्भात आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी पोलिसांनी व्याजाच्या नावाखाली मालमत्तांची चुकीची नोंदणी रद्द करण्याचे आश्वासन दिले. पीडितांनी थेट पोलिसांकडे येऊन तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून व्याज वसुली करणाऱ्यांवर नवीन व जुन्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

एसपींनी गोकाक उपविभागातील पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पथकाचे कौतुक केले. पत्रकार परिषदेला गोकाकचे डीएसपी रवी नायक, सीपीआय आर. सुरेशबाबू, श्रीशैल बॅकूड, पीएसआय के. वालीकार, कुरण मोहिते, यमनप्पा मांग, आनंद, निखिल कांबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.








