- अथणी तालुक्यातील घटना
अथणी / वार्ताहर
घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील हळ्याळ गावात गुरुवारी सकाळी
ही घटना घडली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले.
धनपाल कांबळे आणि अनसूया कांबळे हे दाम्पत्य सकाळी स्वयंपाकासाठी गॅस पेटवत असताना अचानक मोठ्या आवाजासह सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की घराच्या भिंतींचे तुकडे होऊन ढिगारा कोसळला आणि दोघेही त्याखाली अडकले.
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी दाम्पत्याला अथणी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अथणी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे.








