लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी लातूरमधील देवघर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही वर्षांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर घरच्याघरी उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेस पक्षासह विविध स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात पाटील यांनी देशातील अनेक प्रतिष्ठित पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. ते लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, तसेच विविध महत्वाच्या मंत्रालयांचे मंत्री म्हणून कार्यरत होते. भारताच्या संवैधानिक आणि संसदीय प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

लातूर जिल्ह्यातील चाकूरचे ते अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय नेते होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजयी होत त्यांनी या भागात मजबूत राजकीय पकड निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने अनुभवी, शिस्तप्रिय आणि सौम्य नेतृत्वाचा धागा तुटल्याची भावना राजकीय, सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.