अथणी / वार्ताहर

अथणी तालुक्यातील तेलसंग गावात पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

यलिहदलगी (ता. अथणी) येथील रहिवासी भीमा भोसले याने १० डिसेंबर रोजी पत्नीच्या माहेरी जाऊन वाद घातला. “तुम्ही माझ्या पत्नीला तुमच्या गावी का घेऊन गेलात?” असे म्हणत त्याने संतापाच्या भरात घरातील सहा जणांवर पेट्रोल ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत संजू साळुंके, शंकर साळुंके, कृष्णा साळुंके, अंकुश फडतरे, मनोहर फडतरे आणि राणी भोसले हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी ऐगळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.