- नेसरगी पोलिसांची कारवाई : आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बेळगाव / प्रतिनिधी
दुचाकीवरून जनतेचे पैसे आणि वस्तू हिसकावून घेणाऱ्या पाच आरोपींना अटक करून त्यांना रिमांडवर घेण्यात नेसरगी पोलिसांना यश आले आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावातील राजू आडिवेप्पा शिवबसन्नावर यांनी नेसरगी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका संशयिताने दुचाकीवरून येत राजू यांना चाकुचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडून रू. २९,०७० /- आणि रू १२,०००/- चा टॅब लुटल्याचा आरोप आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरगी पोलीस निरीक्षक गजानन नायक यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी कारवाई करून इरप्पा महादेव पावडी, प्रशांत उर्फ परसा रामचंद्र नारी, निंगाप्पा उर्फ अजय आडिवेप्पा दोडमणी, रामाप्पा उर्फ रमेश बाळप्पा हलबन्नावर आणि सदानंद उर्फ सदाशिव बाळप्पा उद्यनायक या पाच आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी नेसरगी पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.