• यमकनमर्डी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या स्टाईलने चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आरोपी सुरेश मारुती नायक सनदी याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहनांसह अनेक ठिकाणी चोरी केल्या होत्या. १२८० ग्रॅम सोने, सुमारे साडेआठ किलो चांदी, ₹१.२५ लाख रोख रक्कम, एक थार वाहन आणि दोन दुचाकी असा एकूण माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला.

ही कारवाई बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, पोलिस उपअधीक्षक रवी नाईक आणि यमकनमर्डी पोलिस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या विशेष पथकाने आरोपीला पकडले.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपीने याआधीही यमकनमर्डी, मणगुत्ती आणि संकेश्वर परिसरात चोऱ्या केल्या होत्या. वैज्ञानिक तपास पद्धतींच्या साहाय्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले.

सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे.