• दोन गटांत तुफान हाणामारी : गावात तणावाचे वातावरण

बैलहोंगल / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात वाल्मिकी भवन निर्मितीच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष होऊन परिस्थिती चिघळली. या वादाचे रूपांतर थेट हाणामारी आणि जमावाच्या हल्ल्यात झाले असून, एका कुटुंबावर दगडफेक व तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाल्मिकी पुतळा व भवनासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षण कामाला सदाशिव भजंत्री यांच्या कुटुंबाने विरोध केल्याने शेकडो लोक संतप्त झाले. संक्रांतीच्या सणानिमित्त घरात स्वयंपाक सुरू असतानाच जमावाने त्यांच्या घरावर अचानक दगडफेक केली. या हल्ल्यात घराचे छप्पर, शौचालय तसेच घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. हातात दगड व लाठ्या घेऊन महिलांसह अनेकजण हल्ल्यात सहभागी असल्याची दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

हल्ल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी दरवाजे बंद करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने दरवाजे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली असून जखमींना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणात वाल्मिकी समाजावर २००८ पासून अन्याय होत असल्याचा आरोप करत, संबंधितांनी बेकायदेशीर अतिक्रमण आणि पूर्वी दिलेल्या घरांच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटनेचे व्हिडिओ तपासून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. नेसरगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या देशनूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.