अथणी / वार्ताहर
डीसीसी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष एन. के. करेण्णवर यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री व आमदार लक्ष्मण सवदी, त्यांचे पुत्र चिदानंद सवदी आणि समर्थकांनी मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मात्र या आरोपांना आमदार लक्ष्मण सवदी यांनी ठामपणे नकार देत आपले नाव जाणूनबुजून गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
करेण्णवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अथणी येथील लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला झाला. डीसीसी बँक निवडणुकीदरम्यान जारकीहोळी गटासाठी काम केल्याच्या रागातून सवदी पिता-पुत्र व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, “माझ्या मृत्यूस सवदी जबाबदार असतील,” असा आरोप करणारा व्हिडिओही त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार लक्ष्मण सवदी यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले. युनियनमधील अंतर्गत आर्थिक वादाबाबत चर्चा करण्यासाठी करेण्णवर आले असताना बाहेर कार्यकर्त्यांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ झाल्याने धक्काबुक्की झाली असावी, मात्र या घटनेत स्वतःचा किंवा आपल्या पुत्राचा कोणताही सहभाग नसल्याचे सवदी यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही लक्ष्मण सवदी यांनी केली आहे.








