- एकाच पदावर दोघांचा दावा
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात एका पदासाठी दोन तहसीलदार असल्याचा पेच निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये कोण खऱ्या अर्थाने तहसीलदार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पूर्वीचे तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची बदली झाल्यानंतर मंजुळा नायक यांनी नव्या तहसीलदार म्हणून रुजू होऊन नियमित कामकाज सुरू केले होते. मात्र आज, दुंडप्पा कोमार हे न्यायालयीन आदेश दाखवत कार्यालयात पोहोचले आणि पुन्हा पदभार स्वीकारण्याचा दावा केला.
या प्रकारामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मंजुळा नायक यांनी आपणच सध्या कायदेशीररित्या पदावर असल्याचे स्पष्ट केले असून आपले कामकाज कायम सुरु ठेवले आहे.
संविधान दिनाच्या कार्यक्रमात मंजुळा नायक यांचे तहसीलदार म्हणून नाव अंतर्भूत असल्याने त्यांनाच अधिकृत मानले जात असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तथापि, न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्याचे सांगणारे दुंडप्पा कोमार यांनी पुढील निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर केली आहेत.
या संपूर्ण घडामोडींमुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले असून, अंतिम निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.








