- मुख्य दिवशी नैवेद्य व पालखी सोहळ्याने यात्रेला धार्मिक उत्साह
बेळगाव : उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील श्री मायाक्का देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे. आज गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळपासूनच नैवेद्य अर्पण आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.
रविवार, १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेत अवघ्या तीन दिवसांत लाखोंच्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. मुख्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारीच महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने चिंचलीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत चिंचलीकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
आज पहाटेपासूनच लिंब नेसण्यासाठी आणि नैवेद्य अर्पणासाठी भाविकांची गर्दी चिंचली परिसरातील गावांमध्येही दिसून आली. अनेक भाविकांनी उपलब्ध जागेत मुक्काम ठोकून सकाळी देवीला नैवेद्य अर्पण केला. आज रात्री पारंपरिक पालखी सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे चिंचली परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला आहे.







