बेंगळूर : गोवा – दिल्ली विमानप्रवासादरम्यान आपत्कालीन सीपीआर करून एका अमेरिकन महिलेचा जीव वाचवणाऱ्या खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेतली. वैद्यकीय व्यवसायातून राजकारणात सक्रिय असतानाही, योग्य वेळी रुग्णाच्या मदतीला धावून जाणे ही त्यांची सेवाभावी वृत्ती आणि वक्तशीरपणा अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

“सत्तेत असो वा नसो, कोणत्याही सन्मानाची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणारे अंजलीसारखे लोक समाजासाठी आदर्श आहेत,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, देवाने डॉ. अंजली निंबाळकर यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे, जेणेकरून त्या भविष्यातही अधिकाधिक लोकांची सेवा करू शकतील, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या या धाडसी आणि मानवी सेवेमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.