• ग्रंथदिंडी, लोकार्पण, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

खानापूर : चापगाव (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा आपल्या स्थापनेची शंभरी पूर्ण करत असून दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी शतकमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि. १ फेब्रुवारी १९२६ रोजी स्थापन झालेल्या या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे.

शतकमहोत्सव कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. उद्घाटन समारंभ प.पू. चन्नबसव देवस रुद्रस्वामी मठ, अवरोळी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतकमहोत्सव समितीचे अध्यक्ष विलास धबाले राहतील.

नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळा इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री Satish Jarkiholi यांच्या हस्ते होणार आहे. प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील, ग्रंथदिंडीचे उद्घाटन माजी आमदार दिगंबर पाटील व माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होईल. संगणक कक्षाचे उद्घाटन ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दुपारी २.३० ते ४ या वेळेत व्याख्याते गणेश शिंदे यांचे ‘मातृभाषेचे महत्त्व व संस्काराची गरज’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश पवाले भूषवणार आहेत.

  • गुरुवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :

गुरुवार, दि. २६ रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे राहतील. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून शतकमहोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे.