हैदराबाद : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका गंभीर अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चेवेल्ला मंडलातील खानापूर गेट परिसरात टीजीएसआरटीसीची बस आणि रेतीने भरलेल्या टिप्पर ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन ही भीषण दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेती वाहतूक करणारा ट्रक चुकीच्या दिशेने चालविला जात होता. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला थेट धडक बसली. टक्कर एवढी जबरदस्त होती की ट्रकमधील रेतीसह मालाचे ओझे बसवर कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बचावकार्याला सुरु केले. सध्या ट्रक चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.