• रायबाग तालुक्यात भीषण अपघात 
  • पती-पत्नी आणि सात वर्षांची मुलगी जागीच ठार
  • दुचाकीचा चक्काचूर

रायबाग / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

आलखनूर गावाजवळ हा अपघात घडला. गिरेप्पा कुंद्राळी (वय  ३८), त्यांची पत्नी मंजुळा गिरेप्पा कुंद्राळी (वय २८) आणि मुलगी आराध्या (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब एकाच दुचाकीवरून मिरजहून जमखंडीकडे जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हारूगेरी पोलीस स्थानकाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महामार्गावरील वाहनांचा अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अशा दुर्घटना वाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.