- दिल्ली कसोटीत दणदणीत विजय : मालिका २-० ने खिशात
दिल्ली : अहमदाबादमधील पहिल्या कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने दिल्लीतील दुसऱ्या सामन्यातही वेस्टइंडिजचा पराभव करत मालिका २-० ने खिशात घातली आणि वेस्टइंडिजला व्हाईटवॉश दिला.
- भारताचा पहिला डाव : यशस्वी आणि शुभमनची चमक :
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय डावाला दमदार सुरुवात दिली. यशस्वीने २५८ चेंडूंवर १७५ धावांची दमदार खेळी साकारली, तर कर्णधार शुभमन गिलने नाबाद १२९ धावा ठोकत भारतीय संघाचा डाव ५१८ धावांवर घोषित केला. वेस्टइंडिजकडून जोमेल वॉरिकनने ३ विकेट्स घेतल्या.
- वेस्टइंडिजचा पहिला डाव : कुलदीप यादवची फिरकी जादू :
प्रत्युत्तरात वेस्टइंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर गडगडला. एलिक अथानाज (४१), शाई होप (३६) आणि तेजनारायण चंद्रपॉल (३४) वगळता बाकीचा संघ अपयशी ठरला. कुलदीप यादवने ५ बळी घेत वेस्टइंडिजच्या फलंदाजांची झोप उडवली. जडेजाने ३, तर सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
- वेस्टइंडिजचा दुसरा डाव : कॅम्पबेल – होपचा प्रतिकार :
फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्टइंडिजने दुसऱ्या डावात चांगला प्रतिकार केला. जॉन कॅम्पबेल (११५) आणि शाई होप (१०३) यांनी दमदार शतके झळकावली. अखेरीस संघ ३९० धावांवर सर्वबाद झाला आणि भारतासमोर १२१ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यांनी प्रत्येकी ३, सिराजने २ तर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
- भारताचा दुसरा डाव :
लहान लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल ८ धावांवर बाद झाला. मात्र, के. एल. राहुल (५२) आणि साई सुदर्शन (४५) यांनी संयमी फलंदाजी करत विजय निश्चित केला. भारताने हे लक्ष्य सहज गाठत मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेत वेस्टइंडिजवर वर्चस्व गाजवले.