• हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी
  • जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळुरूतील ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बेळगाव वकिल संघाने तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांवर कठोर शिक्षा व्हावी आणि वकिल संरक्षण कायदा तातडीने लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

बेंगळुरूतील वरिष्ठ वकील व माजी राज्य वकिल संघ अध्यक्ष असलेल्या वाय. आर. सदाशिव रेड्डी यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी अलीकडेच त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकाराचा बेळगाव बार असोसिएशनने तीव्र निषेध करत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव वकिल संघाचे अध्यक्ष एस.एस. किवडसन्नवर यांनी सांगितलं की, न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणून कार्य करणाऱ्या वकिलांवर राज्यभर वारंवार हल्ले होत आहेत. सरकारने वकिल संरक्षण कायदा लागू केला असला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही.

मुख्यमंत्री स्वतः वकील असून अनेक मंत्री सुद्धा वकिल आहेत. तरीही वकिलांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समाजसेवेत कार्यरत असलेल्या वकिलांसाठी संरक्षण आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी हा कायदा त्वरित प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी केली.
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बेळगाव वकिल संघाचे अध्यक्ष एस. एस. किवडसन्नवर, उपाध्यक्ष बसवराज मुगळी, शीतल रामशेट्टी, पदाधिकारी विश्वनाथ सुलतानपुरी, सुनीलकुमार अगसगी, ईरण्णा पूजार, विनायक निंगनूरे, अनिल पाटील आणि अश्विनी हवालदार यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.