- मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला या राज्य महामार्गावर वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन पावशे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बेळगावसह महाराष्ट्रातील सीमाभागातील नागरिक गोव्यातील नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चिपरी विमानतळ तसेच रेडी बंदर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडा मार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि गोवा येथील वाहतूकही याच रस्त्यावरून होत असल्याने सतत वर्दळ असते.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाल्यास कृषीमाल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक सुलभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील सिमेंट व स्टील, सिंधुदुर्ग–गोवा येथील मासळी तसेच कोकणातील हापूस आंब्याची जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यास मदत होईल, असेही पावशे यांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना वसुंधराराजे भोसले, शैलजा खानविलकर, उज्वला कदम पाटील आणि आमदार आशिष देशमुख उपस्थित होते.








