- म. ए. समिती महिला आघाडीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘काळा दिना’ संदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मूक मोर्चात आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
सन १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून कर्नाटक राज्याच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्या काळात सीमाभागातील मराठी भाषिक जनतेचा अन्याय्यपणे कर्नाटकात समावेश करण्यात आला. या घटनेविरुद्ध मागील अनेक दशकांपासून सीमाभागातील सुमारे २५ लाख मराठी भाषिक नागरिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन करत आहेत.
महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर यांनी सांगितले, “या वर्षीच्या मूक सायकल फेरीत सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला निषेध दर्शवावा. महिलांची मोठी उपस्थितीच आपली एकजूट आणि आवाज दाखवेल.”
महिला आघाडीच्या सेक्रेटरी सौ. सरिता पाटील यांनी ‘काळा दिन’ साजरा करण्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले, “त्या दिवशी महिलांनी काळी साडी परिधान करावी किंवा काळी फीत बांधून शांततेत निषेध नोंदवावा.”
बैठकीत उपाध्यक्षा सौ. सुधा काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यामध्ये सौ. भाग्यश्री जाधव, विजया कुडवी, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, कोमल पाटील, सविता काकतकर, माला जाधव, आशा पाटील, अरुणा शिंदे, राजसी बांबुळकर, शामिनी पाटील, विजया शानबाग, लक्ष्मी कुरणे, अनुपा पाटील, प्रथा पिंगुळे, सुनीता कंग्राळकर, इंदू घोरपडे, सुजाना बामुचे, कांचन अळकुंदकर आदींचा सहभाग होता.








