बेळगाव / प्रतिनिधी
म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब आणि अॅक्वेरियस स्विम क्लब, बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ४२ पदकांची कमाई केली. यामध्ये ९ सुवर्ण, १४ रौप्य आणि १९ कांस्य पदकांचा समावेश आहे. या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर बेळगावातील १३ जलतरणपटूंना राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले आहे.
या यशामागे स्विम गुरु उमेश कालघाटगी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले, तसेच प्रशिक्षक अक्षय शेरगार, अजिंक्य मेंडक, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. जलतरणपटूंनी नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे जयंंत हुंबरवाडी आणि इतर मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहेत.








