बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मल्लगौड गिडगेरी, वय २५ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव तसेच यतीराज रामचंद्र परदे, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. तानाजी गल्ली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीसांना माहिती मिळाल्यावर १२ ऑक्टोबर रोजी मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश धामण्णवार व उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नावर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पल्सर NS १२५ मोटारसायकलवरून ५० हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी सांगितले की त्यांनी शहापूर, महात्मा फुले रोड, हुलबट्टी कॉलनीतील खोलीत दारू साठवली आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण १२८ लिटर २५० मिलीलीटर दारू तसेच पल्सर मोटारसायकल जप्त केली. दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवला असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे.