- तस्करीचा गुन्हा उघडकीस ; चालक फरार
रामनगर / वार्ताहर
कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीरपणे नेले जात असलेले मोठ्या प्रमाणातील गोमांस रामनगर पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जप्त केले. गुरुवारी अनमोड घाटात नियमित तपासणीदरम्यान GA 08 A 5193 या क्रमांकाच्या इनोव्हा कारला थांबण्याचा संकेत देताच चालकाने गाडीचा वेग वाढवत गोव्याच्या दिशेने पळ काढला.
याची माहिती तात्काळ धारबांदोडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तस्करांनी पोलिसांना चकवा देत पुन्हा वाहन कर्नाटकाच्या दिशेने वळवले. दरम्यान, रामनगर पोलिसांनी सापळा रचून फिल्मी स्टाईलने गाडी ताब्यात घेतली. परिस्थितीचा अंदाज घेत चालक मात्र वाहन रस्त्याच्या कडेला सोडून जंगलात पसार झाला.
वाहनाची झडती घेतली असता त्यात १ टनांपेक्षा अधिक बेकायदेशीर गोमांस असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गाडी जप्त करून गुन्हा नोंदवला असून फरार चालक व वाहनमालकाचा शोध सुरू आहे.








