- कागवाड पोलिसांची कारवाई
कागवाड / वार्ताहर
शिरगुप्पी परिसरात दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या आरोपीला कागवाड पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करत कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. पोलिसांच्या या झटपट कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
उगार (बी.के.) गावातील शांतू तवक्कर हे दुचाकीवरून शिरगुप्पी गावाच्या बाहेरील भागातून जात असताना आरोपी सागर सनदी याने त्यांना अडवले. बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील सुमारे २ लाख ८१ हजार २८० रुपये रोख रक्कम लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर अवघ्या चार तासांत आरोपी सागर सनदी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या जलद कारवाईमुळे कागवाड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांचे अभिनंदन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.








