- जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा सरकारचा निर्धार : मंत्री दिनेश गुंडुराव
बैलहोंगल : राज्यातील उत्तम व्यवस्थापन असलेल्या रुग्णालयांमध्ये बैलहोंगल तालुका रुग्णालय अग्रस्थानी असून, अशाच पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांचे व्यवस्थापन झाले तर रुग्णांच्या बहुतेक समस्या सुटतील, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केले. स्थानिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ५० खाटांच्या नव्या अतिदक्षता विभागास (सीसीयू) मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने बैलहोंगल तालुका सार्वजनिक रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी सोमवारी करण्यात आली. त्यावेळी मंत्री बोलत होते.
गरीबी निर्मूलन व सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी हमी योजनांद्वारे राज्याला आदर्श बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या विविध कामांसाठी बेळगाव जिल्ह्याला सुमारे ३०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. बैलहोंगल तालुक्यात दरमहा सुमारे २०० प्रसूती होत असल्याने ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची गरज प्रकर्षाने जाणवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात पाच हमी योजनांची अंमलबजावणी सुरू असून सर्व विभागांमध्ये विकासकामे राबवली जात आहेत. पुनीत राजकुमार हृदय ज्योती, टेली आयसीयू आणि गृह आरोग्य योजना प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालय परिसराच्या बांधकामासाठी आवश्यक २ कोटी रुपयांचे अनुदान स्थानिक आमदारांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले की, ५० खाटांच्या सीसीयू बांधकामासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रुग्णालयातील कर्मचारी चांगले काम करत असून सात वर्षांपूर्वी जिथे केवळ ११० ओपीडी नोंदणी होत होती, तिथे आता ८०० हून अधिक रुग्णांची नोंदणी होत आहे. कंत्राटदाराला निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, केएसआरटीसीचे राज्य उपाध्यक्ष सुनील हनुमण्णावर, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडादी, बैलहोंगल तहसीलदार हनुमंत शिरहट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सिद्धाण्णा तसेच आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.







