बैलहोंगल / वार्ताहर
बैलहोंगल तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा सातवर गेला आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी चार कामगारांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.
ही घटना बुधवारी घडली. साखर कारखान्यातील कंपार्टमेंट क्रमांक १ येथे भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे बॉयलरमधील उकळलेला काकवीचा रस कामगारांच्या अंगावर उडाल्याने आठ कामगार गंभीररीत्या भाजले.
अपघातानंतर जखमी कामगारांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालय तसेच बैलहोंगल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी मंगळवारी दीपक मुनवल्ली (वय ३१, रा. नेसरगी, ता. बैलहोंगल), सुदर्शन बनोशी (वय २५, रा. चिक्कमुनवल्ली, ता. खानापूर) आणि अक्षय सुभाष चोपडे (वय ४८, रा. राबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट) या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, गुरुवारी उपचार सुरू असतानाच आणखी चार कामगारांनी प्राण सोडले. त्यामध्ये भरत बसप्पा सरवाडी (वय २७, रा. गोडचिनामलकी, ता. गोकाक), मंजुनाथ मडीवळप्पा काजगर (वय २८, रा. अरवल्ली, ता. बैलहोंगल), गुरुनाथ भीरप्पा तम्मणावर (वय ३८, रा. मारेगुडी, जि. बागलकोट) आणि मंजुनाथ गोपाल तेरादळ (वय ३१, रा. हुलिकट्टी, ता. अथणी) यांचा समावेश आहे. तर राघवेंद्र मल्लप्पा गिरियाळ (वय ३६, रा. गिलीहोसूर, ता. गोकाक) यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
केएलई रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर मृतांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. हा साखर कारखाना विक्रम इनामदार, डॉ. प्रभाकर कोरे आणि विजय मेटगुड यांच्या मालकीचा असून, कारखाना व्यवस्थापनाची निष्काळजीपणा व अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळेच हा अपघात झाल्याचे आरोप पुढे येत आहेत.
या घटनेप्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे तसेच कामगार संघटनांकडून होत आहे.








