अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यात ड्रायव्हिंगवरील वादातून एका युवकाला निर्दयपणे वायरने मारहाण करून त्याचा व्हिडिओ चित्रीत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मायाण्णट्टी गावातील शिवप्पा वागरे याने नागानूर पीए येथील मुरसिद्ध श्रीशैल चौगला या युवकावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने केवळ मारहाणच केली नाही, तर संपूर्ण प्रकार मोबाईलवर चित्रित करून त्याचे प्रदर्शनही केले आहे.
मुरसिद्ध चौगला हा गेल्या गेल्या तीन वर्षांपासून सोमालिंग वागरे यांच्या मालकीच्या मालवाहतूक वाहनावर चालक म्हणून काम करत होता. दारूच्या नशेत वाहन चालविल्याचा संशय असल्याने त्याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर सोमवारी रात्री आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला हारुगेरीजवळील निर्जन भागात नेऊन बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीवर आणि पायांवर खोल जखमा झाल्या आहेत. सध्या तो स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना हारुगेरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.