अथणी / वार्ताहर

दुचाकीवरील ताबा सुटून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील दुरूर गावाजवळ घडली. श्रीशैल हवालदार (वय ५०, रा. तीर्थ गाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशैल हवालदार हे दुचाकीवरून अथणीहून सप्तसागरकडे जात असताना दुरूर गावाजवळ अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ते रस्त्यावरून जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली पडले. ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अथणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.