• अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा
  • भारत आशिया कप चॅम्पियन : तिलक वर्मा विजयाचा शिल्पकार

दुबई : भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे.

भारताला अखेरच्या षटकात ६ चेंडूत १० धावांची गरज होती. १९ व्या षटकात फहीम अश्रफने अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद केले. यानंतर अखेरच्या षटकासाठी रिंकू सिंग फलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर तिलक-रिंकूने २ धावा केल्या. तिलकने दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि इथेच भारताचा विजय पक्का झाला. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा न खेळलेल्या रिंकू सिंहने फक्त १ चेंडू खेळत विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताने पॉवरप्लेमध्ये ३ मोठ्या विकेट्स गमावल्या. अभिषेक ५ धावा करत, गिल १२ धावा तर सूर्यकुमार यादव १ धावा करत बाद झाले. यानंतर तिलक वर्माने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला. तिलक वर्मा अर्धशतक करत मैदानावर पाय घट्ट रोवून उभा राहिला. संजू २४ धावा करत बाद झाला. तिलकने यानंतर शिवम दुबेसह अर्धशतकी भागीदारी केली. शिवम दुबेने तिलक वर्माला चांगली साथ दिली. तिलक – शिवमने ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शिवम दुबेने कमालीचे मोठमोठे फटके खेळले. तिलक वर्मा भारतासाठी या सामन्यात तारणहार ठरला. पाकिस्तानकडून फहीम अश्रफने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले. तर अबरार अहमद आणि शाहीन आफ्रिदीने १-१ विकेट घेतली.

प्रारंभी भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने ५६ धावा केल्या. यासह फरहानने पुन्हा भारताविरूद्ध अर्धशतक झळकावले. तर फखर जमाननेही ४६ धावांची खेळी केली. पण वरूण चक्रवर्तीने ८४ च्या धावसंख्येवर पाकिस्तानला पहिला धक्का दिला आणि साहिबजादा फरहान ३८ चेंडूत ५७ धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन ४६ (३५) तर सैम अयूब १४ (११) धावा करून बाद झाले. बाकीच्या फलंदाजांमध्ये तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा ८ , हुसैन तलत १, मोहम्मद नवाज ६ आणि हारिस रऊफ ६ धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव १४६ धावांवर आटोपला.

  • कुलदीप यादवची फिरकी जादू :

कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानची कंबर मोडली, त्याने ४ षटकांत ३० धावा देत ४ गडी बाद केले. कुलदीप यादवसह अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.