- गृहमंत्री जी. परमेश्वर यांचा आदेश
बेंगळुरू : राज्य पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाची गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गंभीर दखल घेत संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या दोन दिवसांपासून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज – प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डीजीपी डॉ. रामचंद्र राव यांना तातडीने सेवेतून निलंबित केले आहे.
सरकारी सेवेला न शोभणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत, भारतीय सेवा आचारसंहिता नियमावली १९६८ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला कर्तव्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना गृहमंत्री जी.परमेश्वर म्हणाले की, “अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला शोभणारे नाही. या घटनेमुळे पोलीस दलाच्या शिस्तीचा भंग झाला असून, त्यामुळे तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.” या घटनेमुळे राज्यातील पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








