रामनगर / प्रतिनिधी
बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटात असणाऱ्या गोवा हद्दीतील डांबरी रस्त्याला गुरुवारी मध्यरात्री चर गेल्याचे निर्देशनास आले होते. यामुळे गोवा पीडब्ल्यूडी विभागाने सदर चर सिमेंटीकरण करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. परंतु पावसाच्या जोरामुळे सदर चर पडलेल्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे फक्त एका बाजूनेच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सततच्या पावसाचा जोर सध्या वाढत चालला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने गेल्यास या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. बेळगावकडून गोव्याला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या मार्गावरून नियमित स्वरूपात होणारी वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.