• अपघातात दुचाकीस्वार गंभीर
  • धडकेनंतर वाहन पलटी ; चालकाला नागरिकांनी पकडले

जोयडा : बेळगाव – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता भीषण अपघात घडला. आरटीओ तपासणी नाक्याजवळ राजस्थान क्रमांकाच्या पिकअपने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की पिकअप वाहन रस्त्यावर पलटी झाले, तर दुचाकी पूर्णपणे चुराड्यात बदलली.

या अपघातात कारलगा (ता. खानापूर) येथील संतोष पाटील (वय ३२) जखमी झाले आहेत. ते गोव्यातील मायक्रो लॅब कंपनीत कामावर जात असताना घाटातील तीव्र वळणावर हा प्रकार घडला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, रुग्णवाहिका सुमारे तासभर उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जखमी संतोष पाटील यांना प्रथम रामनगर रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहनांची रांग सुरळीत केली. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.