बेंगळूर : कर्नाटक सरकारने पोलीस आणि परिवहन विभागाकडे प्रलंबित असलेल्या दंडावर नागरिकांना ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो वाहनचालकांना जुन्या दंडाची रक्कम भरताना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही विशेष सवलत २१ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या या मर्यादित कालावधीतील योजनेंतर्गत नागरिकांनी जुने प्रलंबित दंड त्वरीत भरून फायदा करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस विभागाच्या ई-चलान प्रणालीमध्ये नोंद असलेल्या प्रकरणांवरील थकीत दंड ; परिवहन विभागात १९९१-९२ ते २०१९-२० या कालावधीत नोंदवलेली आणि अद्याप भरली न गेलेली दंडाची प्रकरणे या दोन्ही प्रकारांमध्ये आकारण्यात येणाऱ्या दंड रकमेवर अर्धी सूट लागू असेल.

सरकारने विविध प्रशासकीय प्रस्तावांचे परीक्षण करून हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हे शासनादेश परिवहन विभागाचे उपसचिव रंगप्पा करार यांनी जाहीर केले.