• हायकमांडच्या आदेशानुसार भविष्यातही एकत्रचं काम करणार
  • मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. आज दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकतेचा संदेश दिला. “माझ्यामध्ये आणि डी. के. शिवकुमार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि भविष्यातही राहणार नाहीत. हायकमांडचे आदेश पाळत आम्ही एकत्र काम करू,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

कावेरी निवास येथे झालेल्या नाश्त्याच्या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. “डी. के. शिवकुमार माझ्या घरी नाश्त्यासाठी आले होते. पक्षनेतृत्वाने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही परस्पर संवाद साधला. काही अनावश्यक गोंधळ निर्माण झाला होता. आम्ही शांततेत बसलो आणि पक्षाच्या आगामी कार्यक्रमांवर चर्चा केली,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

२०२८ च्या विधानसभेच्या निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. “काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही एकत्रितपणे रणनीती आखणार आहोत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ,” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, “आम्ही लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हेच आमचे ध्येय आहे. हायकमांडच्या सूचनेनुसार राज्यकारभार चालवला जात आहे. कोणताही गट किंवा गटबाजी आम्ही मान्य करणार नाही. पक्षातील सर्व नेत्यांसह आम्ही एकसंघ राहून काम करत आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काँग्रेस पक्षात नेतृत्व बदल किंवा अंतर्गत मतभेद याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना या बैठकीमुळे मोठा ब्रेक लागला असून, सत्ताधारी पक्षाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.