- पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धनाची कामे सुरू
कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या बहुप्रतिक्षित विकास आराखड्याला अखेर मंगळवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यात आली आहेत.
अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी एकूण १,४४५ कोटी ९७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १४३ कोटी ९० लाख रुपये खर्चून मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार असून, त्यातील ३४ कोटी ७८ लाख रुपयांची कामे थेट मंदिर परिसरात राबवली जात आहेत. या कामांना आता औपचारिक सुरुवात झाली आहे.
तसेच जोतिबा देवस्थान विकासासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात ३३ कोटी ९० लाख रुपयांची मंदिर जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यात दोन्ही तीर्थक्षेत्रांतील कामे प्रामुख्याने मंदिरांचे जतन आणि संवर्धन यावर केंद्रित आहेत. त्यामुळे ही सर्व कामे राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली केली जाणार आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मान्यताप्राप्त ठेकेदारांकडूनच निविदा मागवण्यात आल्या असून, ठेकेदार निश्चित करून त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
ठेकेदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी दिली. या विकासकामांमुळे अंबाबाई आणि जोतिबा ही दोन्ही तीर्थक्षेत्रे अधिक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुसज्ज होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








