खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या चापगाव येथील तरुणाचा वंटमुरी घाटात अपघाती मृत्यू झाला.आज बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली.
श्रीधर निंगाप्पा पाटील (वय ३०, रा. चापगाव ता. खानापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गवंडी कामासाठी इचलकरंजी येथे वास्तव्यास होता. नवरात्री निमित्त तो आपल्या गावी आला होता. पूजा विधी आटोपल्यानंतर पुन्हा इचलकरंजीला कामावर जात असताना वंटमुरी घाटात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
श्रीधरचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.