रामनगर / प्रतिनिधी
रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अपघात टळल्याचा प्रकार रविवारी सकाळी लोंढा – कॅसलरॉक मार्गावर तिनई घाटाजवळ घडला. देवळीजवळील रेल्वेमार्गावर सकाळी झाड कोसळले. गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब येताच त्याने रेल्वेमार्गावर एक किमी अंतर धावून गोव्याहून येणारी मालगाडी थांबविली. मात्र, धावताताना मार्गावर पडून तो जखमी झाला आहे.
ओमप्रकाश असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो रात्री रेल्वेमार्गावर गस्त घालून सकाळी परतत होता. त्याचवेळी मागे झाड कोसळल्याचा आवाज त्याला आला. त्याने मागे जाऊन पाहिले असता रेल्वेमार्गावर झाड कोसळल्याचे दिसले. विजेचा एक खांबही मोडून पडला होता. काही वेळातच गोव्याहून मालगाडी येणार होती. मोठा अपघात होण्याची शक्यता होती. झाड तत्काळ हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे, त्याने क्षणाचाही विलंब न लावता कॅसलरॉकच्या दिशेने रेल्वेमार्गावरुन धावत जाऊन मालगाडी थांबविली. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. मात्र, रेल्वेमार्गावरुन धावताना पडल्याने त्याचे दोन दात मोडले असून चेहऱ्यालाही जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी रामनगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमी होऊनही पळत जाऊन रेल्वे थांबविल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.