• चिक्कोडी तालुक्यातील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या आवारात दुर्घटना

चिक्कोडी / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा परिसरातील मोरारजी देसाई निवासी शाळेत दुपारच्या सुट्टीत खेळताना विद्युत तारेच्या स्पर्शाने एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

या दुर्घटनेत कृष्णा मन्जुनाथ हेगडे (रा. मूळगाव – नव गाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तो मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी मैदानाबाहेर गेला. याचवेळी शाळेच्या आवारात पडलेल्या विद्युतभारित तारेच्या संपर्कात आला असता, वीजेचा तीव्र धक्का बसल्याने कृष्णाचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर शाळा परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून या प्रकरणी तक्रार नोंदवली असून, विद्युत तार शाळेच्या आवारात कशी आणि केव्हा पडली याबाबत तपास सुरू आहे.